Amravati

कैदी मित्राचा वाढदिवस, कारागृहात फेकले फटाके

खबरदार प्रतिनिधी
अमरावती,(दि.7)-कारागृहात बंद असलेल्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्याकरिता चक्क कारागृहाच्या भिंतीवरुन फटाके फेकणा:या दोघांना शहर पोलिसांनी अटक केली. मात्र या प्रकारामूळे पुन्हा एकदा जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कारागृहात फटाके फेकल्या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी हर्ष रामदास शेरेकर (22, रा. आझाद चौक, बुधवारा) आणि रोहित मधुकर काळे (25, रा. हनुमान मंदिराजवळ बेनोडा) यांना अटक करण्यात आली आहे.
शनिवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या आवारात मोठा आवाज झाल्यानंतर खळबळ उडाली होती. या घटनेनंतर जेल व पोलिस प्रशासनाची चांगलीच ताराबंळ उडाली. या घटनेच्या माहितीवरून पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलिस उपायुक्त सागर पाटील, गुन्हे शाखेचे पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथक तसेच कारागृह अधीक्षक किर्ती चिंतामणी यांच्यासह आदी वरिष्ठ अधिका:यांनी जेलमध्ये धाव घेतली. त्यावेळी जेलमधील बॅरेक 6 व 7 समोर चेंडुच्या आकाराचे फटाके आढळून आले. या घटनेच्या माहितीवरून बॉम्ब शोधक नाशक पथकही घटनास्थळी पोहोचले. बीडीडीएस या पथकाने बॉम्बची तपासणी केली असता, ते चेंडुच्या आकाराचे गावठी बॉम्ब असल्याचे निदर्शनास आले. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींना शोधून काढले. त्यांनी जेलमध्ये असणा:या एका साथीदाराच्या वाढदिवसासाठी अमरावती ते नागपूर एक्सप्रेस हायवेवरून कारागृहात फटाके फेकून आनंद साजरा केल्याचे पोलिस चौकशीत पुढे आले.

हत्येचा आरोपी कैद आहे पिंट्या
बेनोडा आणि यशोदा नगर परिसरात गुंडगिरी करणारा प्रवीण बनसोड उर्फ पिंट्या हा हत्येच्या आरोपात अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात बंद आहे. शनिवारी सहा जुलैला त्याचा वाढदिवस असल्यामुळं त्याचे साथीदार ‘हर्ष शेरेकर’ आणि ‘रोहित काळे’ या दोघांनी कारागृहाच्या मागून जाणाऱ्या अमरावती नागपूर एक्सप्रेस हायवेवर रात्री आठ वाजेच्या सुमारास फटाके फोडले. यानंतर या दोघांनी बॉम्बसदृश्य दोन वस्तू एक्सप्रेस हायवेवरून कारागृहाच्या आतमध्ये फेकल्या. यापैकी एक बॉम्बसदृश्य वस्तू हवेतच फुटली तर दुसरी कारागृहात जाऊन पडली. बॉम्बसदृश्य वस्तू कारागृहात फेकण्यात आल्यामुळं कारागृह प्रशासन हादरले होते.

महामार्गाच्या बाजूला तपासणी
यानंतर रात्रभर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. सकाळी पुन्हा महामार्गाच्या बाजूला तपासणी केल्यावर फुटलेले फटाके आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी रविवारी सकाळी हर्ष शेरेकर आणि रोहित काळे या दोघांनाही अटक केली असल्याची माहिती, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली.

भिंतीची उंची वाढवावी
अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहाची भिंत 1992 मध्ये कारागृहाच्या मागे पंजाबमधून आलेल्या दहशतवाद्यांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारानंतर चार ते पाच फुटांपर्यंत वाढवण्यात आली होती. 2003 मध्ये मात्र, अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्यामागून अमरावती नागपूर एक्सप्रेस हायवे बांधण्यात आला. या एक्सप्रेस हायवेवरून कारागृहाच्या आतमधला परिसर सहज दिसतो. पोलिसांच्या वतीनं गत वीस वर्षात अनेकदा कारागृहाच्या भिंतीची उंची वाढविण्याबाबत कारागृह प्रशासनाला सूचना दिल्या परंतू त्या अंमलात आणल्या नाही. यापुर्वीही अनेकदा गांजा व इतर अंमली पदार्थ चेंडूमधून जेलमध्ये फेकण्यात आले

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!