खाली खवळलेला धबधबा अन् वर साहसी मौज
चिखलद:यातील भीम कुंडावर कँटीलिव्हर प्लॅटफॉर्मची यशस्वी ट्रायल
खबरदार प्रतिनिधी
अमरावती,(दि.15)-विदर्भाचे नंदनवन चिखलदरा येथे पर्यटकांचे आकर्षण वाढविण्याच्या दृष्टीने वन विभागाकडून विविध प्रयत्न केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून भिमकुंडावर कँटिलिव्हर प्लॅटफार्म तयार करण्यात आला आहे. ज्यामाध्यमातून 1500 फुट दरीवर चित्तथरारक साहसी खेळाचा अनुभव पर्यटकांना घेता येणार आहे. या कँटीलिव्हर प्लॅटफॉर्मची यशस्वी ट्रायल घेण्यात आली. या ट्रायलचा एक व्हिडीओसुध्दा व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये खाली खवळलेला धबधबा अन् वर एक युवक साहसी खेळ करताना दिसत आहे.
जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांच्या संकल्पनेतून या प्रकल्पाच्या निर्माणाची सुरुवात झाली आहे. भिमकुंडाच्या दरीच्या एका टोकाला मजबूत अश्या केबलच्या माध्यमातून दुसरे टोक जोडले जाणार आहे. या केबलच्या आधारावर 1500 फुटाहून अधिक उंचिवर हवेत विविध साहसी खेळ खेळण्याचा अनुभव पर्यटकांना मिळणार आहे. पर्यटकांच्या संपुर्ण सुरक्षेची काळजी याचे संचलन करणा:या कंपनीकडून घेतली जाणार आहे.
विविध साहसी खेळ
माउंटेरिंगमध्ये अनुभव असलेली पुणे येथील एक्स लिमीट नामक कंपनी या कँटिलिव्हर प्लॅटफॉर्म ची निर्मीती करित आहे. ज्या माध्यमातून झिप लाईन, ज्वायंट स्वींग, स्काय सायकल अश्या साहसी खेळांचा अनुभव घेता येईल. जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांनी जिल्हा नियोजनमधून या प्रकल्पाकरिता निधी मंजूर केला असून येत्या दोन महिन्यात हा प्रकल्प पुर्णत्वास येईल. पर्यटकांना आकर्षीत करण्याकरिता अत्यंत महत्वाची भूमिका या प्रकल्पामूळे साध्य होणार असल्याची माहिती एसीएफ भाले यांनी दिली.