Blog

मत द्या आम्हाले, सारं फुकट तुम्हाले…एक नमन गौरा !

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झडत्यांच्या केंद्रस्थानी

नितीन दुर्बुडे
पथ्रोट,(दि.3)- पोळ्याच्या दिवशी तोरणाखाली बैलांना घाट लावुन पुजा करत असताना ‘झडत्यांचा’ मुकाबला चांगलाच रंगला असता यंदा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही चांगली चर्चेत राहीली झडत्यांच्या केंद्रस्थानी होती. एवढच काय तर चक्क घोड्याच्या पाठीवरही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना झळकली हे विशेष.
‘नवं नवं सरकार नवी नवी थीम,
नवी नवी योजना नवी नवी स्कीम
लाडाचा भाऊ लाडाची बहीण
लाडाचा ब्याही लाडाची विहीन
मत द्या आम्हाले
सारं फुकट तुम्हाले…एक नमन गौरा पार्वती हरऽऽ बोला हरऽऽ हर ऽऽ महादेव

बैलाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे पोळा. शेतकऱ्याची व्यथा पोळ्याच्या दिवशी गाण्याच्या झडत्यातून व्यक्त होते. पोळ्याच्या दिवशी मैदानात ‘झडत्यांचा’ मुकाबला चांगलाच रंगतो.
‘परावटीवर पडली बोंड अळी xxबुडा म्हणते बुडाली शेती, xxx पाटील म्हणते लाव मातीले छाती,
एक नमन गौरा पारबती हरऽऽ बोला हरऽऽ हर ऽऽ महादेव’
पोळा सणात बैल, नंदीसाठी म्हटलेल्या गीतांना झडत्या असे म्हणतात. हा लोककलेतील काव्यप्रकार. गावातील लोकच झडत्यांची निर्मिती करतात. विशिष्ट लयीत बैलांच्या साक्षीने झडत्या सादर होतात.
‘वरच्या राणातून आणली माती,
ते देल्ली गुरूच्या हाती,
गुरूनं घडविला महानंदी,
ते नेला हो पोळ्यामंदी,
एक नमन गौरा पारबती हरऽऽ बोला हरऽऽ हर ऽऽ महादेव’

दरवेळी पोळ्याला झडत्यांचा विषय बदलतो. वर्तमानातील समस्या, राजकारण, व्यक्ती, महागाई, भ्रष्टाचार यावर झडत्यांमधून व्यंगात्मक टीका केली जाते. गेली तीन वर्षे झडत्या पीएम, सीएम यांना केंद्रस्थानी ठेवून झडत्या जात आहेत. यावर्षी ओला दुष्काळ, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे विषय झडत्यांच्या केंद्रस्थानी हेात्या. झडत्यांच्या माध्यमातून शेतकरी आपल्या मनातील वेदनेला व्यंगातून व्यक्त करतात.
‘आभाळ गडगडे, शिंग फडफडे,
शिंगात पडले खडे,
तुही माय काढे तेलातले वडे,
तुया बाप खाये पेढे,
एक नमन गौरा पार्वती हरऽऽ बोला’

सजविलेले बैल मारुतीच्या मंदिरापुढे नेवून देवदर्शन घेतात. तोरणाखाली पोळा भरतो. त्यांना खास पुरणपोळीचा पाहुणचार दिला जातो. पोळा फुटण्यापूर्वी गर्दीतील एखादा शेतकरी झडत्याची सुरूवात करतो.


गाढवासोबत आता घोडाही घाटाखाली

बैलपोळ्याच्या दिवशी जर कुठल्या गावात गाढवांची पूजा होत असेल तर नक्कीच हे ऐकायला आश्चर्यकारक वाटेल, जिल्ह्यातील रासेगावमध्ये आजच्या बैलपोळ्याच्या दिवशीच गाढवांचा पोळा साजरा करण्यात येतो. अचलपूर तालुक्यात असलेलं रासेगाव गाढवांच्या पोळ्यासाठी पंचक्रोशत प्रसिद्ध आहे. आजच्या दिवशी ज्याप्रमाणे बैलांचा साजशृंगार केला जातो, त्याचप्रमाणे गाढवांचा सुद्धा साजशृंगार करून गाढवांना पुरणपोळी, कुरडया,पापड-भजे यांसारखे स्वादिष्ट पदार्थ दिल्या जातात. ज्याप्रमाणे आजच्या दिवशी बैलांचा सन्मान केला जातो, त्याच प्रेमाने या गावात गाढवांचा हा पोळा साजरा करण्यात येतो. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कापुसतळणी येथील कुंभार समाजबांधव नंदु उर्फ गुड्डु लोंदे याने याने आपल्या घोड्यास आकर्षक रित्या सजवुन मुख्यमत्री माझी लाडकी बहीण त्याच्या पाठीवर लिहुन काकडखेल येथील तोरणाखाली घाट लावला असता गावकर्यांाचे लक्ष वेधुन घेतले.

Back to top button
error: Content is protected !!