मारोती पाटणकर
खबरदार प्रतिनिधी, चुरणी,(दि.28)-मेळघाटातील डॉक्टरांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. आपला जीव धोक्यात घालून या पठ्ठयांनी अख्खं गावचं वाचविले. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतूक होत आहे. धारणी तालुक्यातील हरिसाल प्राथमिक आरोग्य केंद्रापासून 22 किलोमीटर असलेल्या कोकमार येथे अतिसार रुग्ण निघत असल्याने वेळीच अटकाव करण्याकरिता निघालेल्या डॉक्टराच्या पथकाला मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. जीव धोक्यात टाकुन या पथकाने कोकमार येथे पोहचून येथील रुग्णांचे प्राण वाचविले. काय-काय घडलं याची सविस्तर माहिती ‘खबरदार’ तुमच्या पर्यंत पोहचवित आहे.
गुरुवारी रात्री 11.30 वाजता कोकमार येथील आरोग्य सेविका व आशा सेविका मार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र हरिसाल येथील डॉक्टरांना माहिती मिळाली की, कोकमार गावात अतिसाराचे रुग्ण निघत आहे. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी वैष्णवी हरणे यांच्या आदेशावरुन सकाळी 7 वाजता आरोग्य सहायक समीर डिके, वसंत सावरकर व अल्ताफ शेख यांच्यासह आरोग्य केंद्राचे कर्मचारी आरोग्य केंद्रातून कोकमार पाऊस असल्यामुळे जीवनदायी रुग्णवाहिका घेवून निघाले. त्यांच्यासोबत चौराकुंड येथील आरोग्य सेविका सोनी वरघट सोबत होत्या. दोन दिवसापासून कमी प्रमाणात असलेला पाऊस गुरुवारी अचानक वाढला. चौराकुंड पार करताच पावसाचा जोर वाढला. संपुर्ण मार्गावर पाणीच पाणी झाले. वाहन चालविणे खूप कठीण झाले. तरीही चालक प्रतीक गायन मोठ्या परिश्रमाने गाडी चालवित होते. जीव मुठीत घेवून छोटे-छोटे रपटे ओलांडावे लागत होते.
वनकर्मचा:यांची घेतली मदत
डॉक्टरांचे पथक चोपण गावाजवळ पोहोचले, परंतु तेथेही रपट्यावर पाणी जास्त असल्यामुळे पथकाला 30 ते 40 मिनिटे थांबावे लागले. पुढे थोडं पाणी कमी झाल्यानंतर पथक चोपण गावात पोहचले. तेथे ज़िल्हा परिषद शाळा समोरील नाल्याला खूप पाणी होते. त्यामुळे वाहन चालकाने रुग्णवाहीका टाकणे टाळले. डॉक्टरांच्या पथकाने गावाकऱ्यांचा मदत घेऊन तो नाला ओलांडून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने वायरलेस द्वारे कोकमार गावातील परिस्थितीची माहिती घेतली. कोकमार येथील आरोग्य सेविका अर्चना ढोले यांनी परिस्थितीची माहिती दिली.
कापरा नदीत अडकली रुग्णवाहीका
चोपण गावातील नाल्याला पूर कमी झाल्यावर थोड्या वेळाने आरोग्य विभागाची पथकाने कोकमारकडे कूच केली. परंतू चोपण गावाच्या पुढे कापरा नदीच्या समोर रुग्णवाहीका अडकून पडली. नाला खूप भरल्यामुळे गाडी पुढे जात नव्हती. डॉक्टरांच्या पथकाने दोन कर्मचा:यांना तेथेच सोडून कोकमारसाठी पायदळ कूच केली. तब्बल चार किलोमीटर राहीलेले कोकमार पायदळ गाठण्याचे ठरविले.
मानवसाखळी करुन ओलांडला नाला
पायदळ जात असताना पथकाला नागपाटा नाला दुथडी वाहताना दिसला. परंतू डॉक्टरांच्या पथकाने जीवाची पर्वा न करता मानव साखळी करुन खूप हिमतीने नाला पार केला. शेवटी दुपारी 4 वाजता डॉक्टरांचे पथक गावात पोहचले.
तातडीने सुरु केले उपचार
पथक गावात पोहचल्यानंतर प्रथम आशा सेविका व ढोले चे भेट घेऊन सविस्तर माहिती घेतली. नंतर 15 मिनिटे सर्वांनी नियोजन करुन 70 घरे असल्यामुळे 10 ते 12 घरे प्रत्येकाने वाटून घेत, प्रत्येक घरात मीडिक्लोर टाकले. गावक:यांना पाणी उकळून प्यायला सांगितले. रुग्णांची माहिती घेतली. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले.
हातपंप गेले पाण्याखाली
गावात पिण्याचा पाण्यासाठी 3 हातपंप असून दोन हात पंप नाल्याला लागून आहे. सतत चा पावसामुळे दोन्ही हात पंप पूर्णतः पाण्याखाली गेले. तर तिस:या बंद हातपंप चे प्रत्यक्ष क्लोर्रीनेशन करण्यात आले. शेवटी वायरलेस केंद्र कोकमार येथे भेटी देऊन काही अर्जंट चे निरोप असेल तर माहिती बाबत मदत करणे साठी चर्चा करण्यात आले.उपकेंद्र येथे पुरेशा प्रमाणात औषध साठा देत, आशा, आरोग्य सेविका, मदतनीश यांना दररोज घरोघरी मेडिक्लोर टाकणे बाबत सूचना देण्यात आले.
कोकमार हे गाव संपर्क तुटणारे गाव आहे. जातांना दोन ते तीन नाले लागतात रस्ता अतिशय खडतर आहे.परंतू आमच्या पथकाचे जीवावर उदार होत, रुग्णांपर्यंत उपचार पोहोचविले, सर्वांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.
-वैष्णवी हरणे, वैद्यकीय अधिकारी, हरीसाल.
सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. आमचे 8 ते 10 कर्मचारी तैनात आहे. पंचायत समितीकडून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच पाण्याच्या कॅन व बिस्लेरीचे पाणी पोहोचविली जात आहे. पथकाने जीव धोक्यात टाकून केलेल्या कार्याचे कौतूक करावे तेवढे कमीच आहे.
-डॉ.प्रविण पारिसे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी.